
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीचे समुहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण व संतपीठातील प्रेक्षागृह आणि कलादालनासह विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन आणि उदघाटन
संत विचार वैश्विक स्तरावर
नेण्यासाठी संतपीठ उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीचे समुहशिल्प व
संतसृष्टीचे लोकार्पण व संतपीठातील प्रेक्षागृह आणि कलादालनासह विविध विकास
प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन आणि उदघाटन
पिंपरी, १८ जून २०२५ : आपल्या संतांचा विचार हा वैश्विक विचार आहे.
जगाला साद घालणारा व दिशा देणारा हा विचार आहे. हा विचार वैश्विक स्तरावर
नेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने उभारलेले जगद्गुरू संत तुकाराम महाराज
संतपीठ उपयुक्त ठरेल. संस्कृतीतील मूलतत्व कायम ठेऊन संत साहित्याची आधुनिक
पद्धतीने मांडणी येथे केली जात आहे, असे प्रतिपादन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने
पुणे-आळंदी पालखी मार्गावर वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर
महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समुहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण,
संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालनाचे उदघाटन केल्यानंतर
चिखली येथील टाऊन हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात शहरातील विविध विकास प्रकल्पांचे
लोकार्पण, भूमिपूजन आणि उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या शुभहस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे,
शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, संत
साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, माजी आमदार अश्विनी
जगताप, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त
आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. तसेच शहर अभियंता मकरंद
निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य
वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे,
सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, मुख्य
माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उप आयुक्त अण्णा
बोदडे, ममता शिंदे, सचिन पवार, पंकज पाटील, उमेश ढाकणे, पिंपरी
चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप आयुक्त
स्वप्ना गोरे, बापू बांगर, शिवाजी पवार,
माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, माजी नगरसदस्य शत्रुघ्न काटे, माजी पक्षनेते नामदेव ढाके
आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, पिंपरी चिंचवड
महापालिकेने सुंदर संतपीठ तयार केले आहे. येथे विद्यार्थ्यांना सीबीएसई
अभ्यासक्रमासोबतच संस्कृत, मराठी, हिंदी,
इंग्रजी या चारही भाषांमध्ये संत साहित्याचे ज्ञान दिले जात आहे.
आपल्या संतांचा विचार हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम
महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांकडून एका पिढीकडून
दुसऱ्या पिढीला दिला जात आहे. पण संतपीठाच्या माध्यमातून हा विचार वैश्विक स्तरावर
नक्कीच जाईल. त्यामुळे आगामी काळात संतपीठाच्या विस्तारासाठी राज्य सरकार नेहमीच
पाठीशी राहील, असेही श्री फडणवीस म्हणाले.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी
संप्रदायाचा पाया रचला तर जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी त्यावर कळस चढवला, अशी मान्यता आहे.
या संतांच्या वैश्विक विचारामुळे आजही लाखो वारकरी पालखी सोहळ्यास सहभागी होतात.
पिंपरी चिंचवड महापालिकेने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या
भेटीचे भव्य शिल्प उभारले आहे. वारकरी संप्रदायाला एक वेगळी उंची देणाऱ्या संतांचे
हे शिल्प आहे, असेही ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड हे वेगाने नागरीकरण होणारे
शहर आहे. या शहरात महापालिकेच्या वतीने विविध विकास प्रकल्प करण्यात येत आहेत. आज
एसटीपीचे देखील लोकार्पण करण्यात आले आहे. नद्या स्वच्छ करण्यासाठी असे प्रकल्प
उपयुक्त ठरतात. पुणे व पिंपरी चिंचवडच्या नद्यांमध्ये भविष्यात एकही टक्का
मैलामिश्रीत पाणी जाणार नाही, यासाठी नियोजन केले जात आहे. क्रीडा
क्षेत्रात तरुणाईला पुढे जाण्यासाठी व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी योग्य
सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असते. त्यासाठीही पिंपरी चिंचवड महापालिकेने
पुढाकार घेतला असून जागतिक दर्जाच्या क्लायम्बिंग वॉलची उभारणी केली आहे. या
प्रकल्पामुळे नक्कीच शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल व राष्ट्रीय तसेच जागतिक
पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये ते शहराचे नाव उंचावतील, असेही
ते यावेळी म्हणाले.
चऱ्होली येथील नगर रचना योजना रद्द
करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी जाहीर केले. यावेळी ते
म्हणाले, आपल्याला जे करायचे आहे ते जनतेला विश्वासात घेऊन करायचे आहे. शेवटी आपली
महानगरवपालिका ही सुनियोजनबद्ध असायला हवी हे सरकारला वाटते तसे जनतेलाही वाटते.
त्यामुळे कुठलेही प्लॅनिंग करताना नागरिकांना विश्वासात घेऊन, त्यांना समजावून
सांगून शहराचा उत्तम प्लॅन झाला पाहिजे. वाढते शहर आहे आणि वाढत्या शहराचे आपण
योग्य नियोजन केले नाही तर उद्याची पिढी आपल्याला विचारेल की आमच्या शहराला
खेड्याचे रूप का दिले? नुसते काँक्रीटचे जंगल का केले? तर
त्याचेही उत्तर आपल्याला दयावे लागेल. त्यामुळे आपण सर्वजण बसून प्रत्येक गोष्टीचे
योग्य पद्धतीने भविष्याचा विचार करून, पुढच्या ५० वर्षात हे शहर कोठे असेल याचा
विचार करून या शहराचे नियोजन आपण करू तेव्हाच लोक आपल्याला लक्षात ठेवतील. मला
विश्वास आहे हे काम आपण सर्वजण मिळून पुढच्या काळात नक्की करू, असेही ते म्हणाले. तसेच
महापालिकेने केलेल्या विकास कामाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.
आमदार महेश लांडगे म्हणाले, पिंपरी चिंचवडला
संतपीठ उभे राहिल्याचा सर्वांना अभिमान वाटत आहे. या संतपीठाच्या उभारणीसाठी
अनेकांनी परिश्रम घेतले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. यासाठी राज्य सरकारनेही
सहकार्य केले व संतपीठाच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध करून दिली. संतपीठाप्रमाणेच
महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले दिव्यांग भवन देखील दिव्यांग बांधवासाठी
उत्तम प्रकल्प ठरत आहे. त्याद्वारे दिव्यांगांना विविध थेरपीज, सोयीसुविधा देण्यात येत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना
आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेच्या भूमिपूजन, लोकार्पण आणि उद्घाटन होणाऱ्या
प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले, पिंपरी चिंचवड नगरी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन
झालेली नगरी असून देहू आणि आळंदीच्या कुशीत वसलेले शहर आहे. अत्यंत झपाट्याने
विकसित झालेल्या या नगरीने गाव ते महानगर आणि महानगर ते स्मार्ट शहर, असा नावलौकिक अवघ्या काही वर्षांमध्ये मिळविला आहे.
ज्या संत आणि महंतांनी या देशाला
आणि राज्याला एक विचार दिला, आणि त्यांच्या विचाराची कास धरूनच संत
ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित समूहशिल्प थोरल्या
पादूका चौकात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारले आहे. त्या ठिकाणी मिश्र
धातूपासून तयार करण्यात आलेली २५ शिल्पे असून ज्यामध्ये संत नामदेव महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह संत सोपान महाराज, संत
निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई आणि २० वारकरी यांचा
समूहशिल्पात समावेश आहे. या परिसरात संतांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर
आधारित ४७ ब्रॉन्झ म्युरल्स उभारण्यात आले असून, त्यांच्या
शेजारी माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत. संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि सर्व
नागरिक बंधू-भगिंनाना प्रेरणा देणारे आणि त्यांच्यामध्ये अध्यात्माची गोडी निर्माण
करणारे हे स्थळ आहे.
टाळगाव चिखली या परिसरात जगद्गुरू
संत तुकोबाराय यांच्या नावाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने संतपीठ सुरू केले आहे.
अवघ्या काही वर्षातच या संतपीठाने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे. संतांची आणि
महंतांची जी परंपरा आहे ती परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आणि ज्ञानाचा हा
जो झरा आहे,
तो पुढच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी पिंपरी चिंचवड
महानगरपालिका प्रयत्नशील आहे. आज या संतपीठात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत,
आणि त्यातून अध्यात्म आणि आधुनिकतेची कास अशा दोन्हीचा मिलाप
याठिकाणी होतोय.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका चालू
आर्थिक वर्षात सुमारे १ लाख ५० हजारपेक्षा जास्त वृक्षारोपण करणार आहे. या
वृक्षारोपणामध्ये प्रामुख्याने रस्त्यांवर, पदपथावर रस्त्याच्या कडेला असलेल्या
मोकळ्या जागा या ठिकाणी देशी झाडे उदा. कांचन, ताम्हण,
वड, चिंच, आंबा, पिंपळ अशा ५० हजार वृक्षांचे रोपण करणार आहे. यासोबतच शहरांमध्ये
नदीकिनारी, नाल्यांच्या बाजूने उद्यानामध्ये सुमारे ५० हजार
बांबूच्या वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका ही हरित
कर्ज रोख्यांद्वारे निधी उभारणारी महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरली आहे.
याद्वारे उभारण्यात आलेला सुमारे २०० कोटी रुपयांच्या निधीचा वापर शहरात विविध
पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत गवळी माथा ते
इंद्रायणीनगर चौक पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्सप्रमाणे विकसित करण्यात
येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग
नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनचक्राचे
मॅपिंग करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिक्षेत्रातील
दिव्यांगांच्या लाईफ सायकलचा अभ्यास करून निरिक्षणे घेऊन केंद्र शासन, राज्य शासन तसेच
महानगरपालिकेच्या योजनांचा लाभ देणे व नाविण्यपूर्ण योजनांची निर्मिती करण्यासाठी
हे सर्वेक्षण उपयुक्त ठरणार आहे.
संत मदर तेरेसा या मुख्य
उड्डाणपुलाशी जोडणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या रॅम्प लुपमुळे
पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या रॅम्प लुपमुळे
आर.ओ.बी, एम.एम. शाळा चौक,
शगुन चौक, पिंपरी चौक व अहिल्यादेवी होळकर चौक
येथील वाहतुक कोंडी देखील कमी होण्यास मदत मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या अमृत १
योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पिंपळेनिलख आणि चिखली मैलाशुद्धीकरण केंद्रांमध्ये पिंपळेनिलख आणि
चिखली परिसरात निर्माण होणाऱ्या मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर पिंपळेनिलख आणि चिखली व आजूबाजूच्या
परिसरातील बांधकामांसाठी, उद्यानातील वापरासाठी, रस्त्यालगत
वृक्षारोपणासाठी तसेच सीटी/पीटी स्वच्छता आदी वापरासाठी करण्यात येणार आहे. याशिवाय या केंद्रांमुळे
इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी होण्यास देखील मदत होणार आहे.
जागतिक ऑलिंपिक संघटनेने
क्लायम्बिंग वॉल या खेळाला ऑलिंपिक दर्जा देताना हा तरूणाईचा खेळ आहे ही बाब
अधोरेखित केली होती. पिंपरी चिंचवड शहरात भारतातील सर्वात जास्त क्रीडा सुविधा
आहेत. तरी पिंपळे सौदागर येथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्लायम्बिंग वॉल
बांधल्यामुळे या खेळाला चालना मिळणार आहे. तसेच आपल्या शहरातील खेळाडूंच्या
कामगिरीमुळे शहराचा नावलौकिक होणार आहे. विशेषत: या भागात असलेल्या शालेय मुलांना
याचा फायदा होणार आहे, कारण हा ऑलिंपिक खेळ असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील
दर्जेदार सुविधा मिळाल्यास त्यांना या खेळात उत्कृष्ट कामगिरी करणे शक्य होणार
आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील शाळेतील मुलांना देखील याचा लाभ होईल, ज्यामुळे समाजाताली तळागळातील अगदी शेवटच्या नागरिकांपर्यंत याचा लाभ
मिळेल.
महापालिकेच्या भोसरी आणि थेरगाव
रुग्णालयांमध्ये स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, अतिदक्षता विभाग इतर सेवा उपलब्ध आहेत. या रुग्णालयांमध्ये दररोज मोठ्या
प्रमाणावर वैद्यकीय सेवा दिल्या जातात. या सर्व वैद्यकीय प्रक्रियांमध्ये
इन्फेक्शन कंट्रोल अत्यावश्यक घटक असतो. या सर्व विभागांच्या कार्यक्षमतेसाठी आणि
जंतू संसर्ग पसरू नये याकरिता साठी
सीएसएसडी ही अत्यावश्यक यंत्रणा गरजेची असते, जी कार्यान्वित
करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी
दिली.
चौकट - पिंपरी चिंचवड पोलीस
आयुक्तालयाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ॲप चे लोकार्पण
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी
विकसित करण्यात आलेल्या जेष्ठानुबंध या ॲपचा तसेच ट्राफिक बडी व्हॅाट्सअप प्रणालीचे
लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते झाले. याबाबत पोलीस आयुक्त
विनय कुमार चौबे यांनी आपल्या मनोगतामध्ये माहिती दिली. ते म्हणाले, ज्येष्ठ
नागरिकांसाठी २४ तास मदतीसाठी हे ॲप उपलब्ध आहे. या ॲपवर ज्येष्ठांसाठी विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय
ट्राफिक बडी व्हॅाट्सअप प्रणाली ही वाहतूक समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी आपुलकी, विश्वास निर्माण करणाऱ्या या दोन्ही
प्रणाली आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरजा
आपटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी
मानले.
