
सकाळी ७ वाजता आयुक्त शेखर सिंह यांनी केली विसर्जन घाटांची पाहणी...
गणेशोत्सवाच्या
पार्श्वभूमीवर भाविकांना गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याबाबत
अधिकाऱ्यांना दिले निर्देश
पिंपरी, २६ ऑगस्ट २०२५ : गणेशोत्सवाच्या
पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज
सकाळी मोशी खाणसह शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांची पाहणी केली. विसर्जनाच्या
दिवशी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विसर्जन घाटांवर आवश्यक सोयीसुविधांसह पुरेशी
सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी, असे निर्देशही आयुक्त सिंह यांनी यावेळी संबंधित
अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणी
दौऱ्यावेळी महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता देवन्ना गट्टुवार, उपायुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे,मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उद्यान अधिक्षक योगेश वाळुंज, कार्यकारी अभियंता हरविंदसिंह
बन्सल, जनता संपर्क
अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व
कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त शेखर
सिंह यांच्या पाहणी दौऱ्याला मोशी खाण येथून सुरुवात झाली. यावेळी आयुक्त सिंह
म्हणाले, ‘मोशी
खाणीकडे येणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकून त्याची डागडूजी करावी. याठिकाणी
महापालिकेच्या आठही प्रभागांतून येणाऱ्या गणेश उत्सव मूर्तींच्या विसर्जनासाठी
पुरेसे कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत. आरोग्य विभाग व सुरक्षा रक्षकांची पथके
येथे कार्यरत ठेवावीत. आवश्यक तेथे सीसीटीव्हीसह लाईट, मंडप, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था
करण्यात यावी,’ असेही
आयुक्त सिंह यांनी सांगितले.
मोशी
खाणीनंतर आयुक्त सिंह यांनी मोशी येथील इंद्रायणी नदी विसर्जन घाट, पिंपरी येथील पवना नदीवरील झुलेलाल
घाट, सांगवी
येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट अशा प्रमुख घाटांची पाहणी केली. यावेळी
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘विसर्जन घाटांवर गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक
उपाययोजना करा. विसर्जन घाटांवर पुरेसे कर्मचारी व यंत्रणा कार्यान्वित ठेवा.
निर्माल्यकुंडाची व्यवस्था करा. कृत्रिम विसर्जन हौदांच्या स्वच्छतेला प्राधान्य
द्या. घाटांवर सुशोभीकरण करा. दिशादर्शक फलक लावा. जीवनरक्षक, अग्निशमन विभागाचे जवान व आपदा
मित्र यांची नियुक्ती करा. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवा. आवश्यक
तेथे सीसीटीव्ही लावा. विसर्जन घाटाकडे येणाऱ्या रस्त्यांची डागडूजी करा,’ असे निर्देश देखील आयुक्त सिंह
यांनी संबंधित विभागप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
पीओपी व
शाडू मातीच्या मूर्तींची नोंद ठेवा...
आयुक्त शेखर
सिंह यांनी गणेश विसर्जन घाटांवर विसर्जन केल्या जाणाऱ्या उत्सव मूर्तींची नोंद
ठेवण्याचे निर्देशही संबंधित विभागांना दिले आहेत. विसर्जनासाठी आलेल्या मूर्तीची
नोंद ठेवताना ती पीओपीची आहे की शाडू मातीची आहे, मूर्तीची उंची पाच फूट किंवा
त्यापेक्षा जास्त आहे का, याप्रमाणे तिची नोंद करून ठेवावी, असे आयुक्त सिंह म्हणाले.
