पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-जुलै २०१५
 

बीआरटीएस प्रकल्पाची पाहणी

   
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या बीआरटीएस प्रकल्पाची पाहणी करण्यास आलेल्या केंद्रीय नगरविकास विभाग व जागतिक बॅँकेच्या अधिका-यांचे स्वागत आयुक्त राजीव जाधव यांनी केले. अतिरिक्त सचिव, केंद्रीय नगरविकास विभाग नवी दिल्ली यांचे बीआरटीएस प्रकल्प पाहणी दौरा अंतर्गत बीआरटीएस आढावा बैठक दि. २५ जुलै २०१५ रोजी सायं. ५.०० वा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात संपन्न झाली.
 
 
दि. २६ जुलै २०१५ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील बीआरटीएस प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी आयुक्त राजीव जाधव तसेच केंद्रीय नगरविकास विभाग नवी दिल्ली संबंधित सर्व अधिकारी जागतिक बॅँकेचे टिम लिडर, सल्लागार, वाहतुक तज्ञ, पीएमपीएमएल व बीआरटीएसचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सांगवी – किवळे मार्गावरील सांगवी पुलाचे कामकाज तसेच जिल्हा रुग्णालया समोरील बस स्थानक, वाकड जंक्शन येथील अंडर पास, ताथवडे चौक येथील बीआरटीएस बस व्यवस्था, मुकाई चौक येथील बीआरटीएस बस टर्मिनल, भोसरी येथील बस टर्मिनल, नेहरुनगर येथील पीएमपीएमएल बस डोपो, पुणे – मुंबई महामार्गावरील गॅमन इंडिया ब्रीज तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबविण्यात आलेली घरकुल योजना इ. प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. यावेळी घरकुल योजनेची कामकाज पुर्ण करुन बीआरटीएस बस सेवा सुरु करण्याबाबत सुचनाही देण्यात आल्या.
 
 

जगद्गुरु संत तुकाराम महाराजाच्या पालखी सोहळ्याचे स्वागत

   
मुखी हरीनामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या गजरात आलेल्या आषाढीवारी पालखी सोहळ्यातील जगद्गुरु संत तुकाराम महाराजाच्या पालखी सोहळ्याचे स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले. महापौर शकुंतला धराडे, आणि आयुक्त राजीव जाधव यांनी भक्ती-शक्ती चौक निगडी येथे दिंडी प्रमुखांना सतरंजी, हार व श्रीफळ भेट देऊन स्वागत केले.
सायंकाळी ५.४५ वाजता या पालखी सोहळ्याचे शहरात आगमन झाले. लाखो वारक-यांचा सहभाग असलेल्या दिंडी प्रमुखांना महानगरपालिकेच्यावतीने सन्मानीत करण्यात आले.


 
 
पालखी सोहळा प्रमुख रामदास मोरे, अशोक मोरे, अभिजीत मोरे, सुनिल मोरे, जालिंदर मोरे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
महापालिकेच्यावतीने विविध सुविधा पुरविल्या आहेत. वारक-यांना पालिकेच्या तसेच खाजगी शाळा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, वैद्यकिय सेवा, फिरते शौचालय आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पालखी सोहळ्या बरोबर पिण्याच्या पाण्याचे टँकर, अँम्ब्युलन्स व अग्निशामक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत

   
टाळ मृदुंगाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे लाखो वारक-यांसह पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळी आगमन झाले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने महापौर शकुंतला धराडे व आयुक्त राजीव जाधव यांनी दिघी मॅगझीन चौक, आळंदी फाटा, भोसरी येथे दिंडी प्रमुखांचे सतरंजी, हार व श्रीफळ भेट देऊन स्वागत केले. लाखो वारक-यांचा सहभाग असलेल्या दिंडी प्रमुखांना महानगरपालिकेच्यावतीने सन्मानीत करण्यात आले.

 
 
या पालखी सोहळ्या प्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपुते, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे तसेच श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख राजाभाऊ चोपदार यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच “समाविष्ट होता ज्ञानेश्वर माऊली देवा इंद्रायणी थांबली, पाऊले चालती पंढरीची वाट, मोगरा फुलला मोगरा फुलला” अशा प्रकारची विविध भक्तिगीते आळंदी येथील जागृती अंध मुलींच्या शाळेतील कुमारी गौरी गणेश इंगळे या मुलीने गावून संपुर्ण परिसर भक्तीमय करुन सोडला.
 
 

पिंपळेगुरव येथील पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन

   
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपळेगुरव येथे उभारण्यात येणा-या २० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले.
महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास शहर सुधारणा समिती सभापती छाया साबळे, नगरसदस्य रामदास बोकड, राजेंद्र जगताप, नगरसदस्या वैशाली जवळकर, शैलजा शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, शहर अभियंता महावीर कांबळे, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, राजेंद्र जावळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


 
 
या पाण्याच्या टाकीमुळे परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. त्यासाठी सुमारे १ कोटी २१ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून या टाकीच्या बांधकामासाठी सुमारे दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे. यावेळी नगरसेवक राजेंद्र जगताप, रामदास बोकड, वैशाली जवळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
 
 

ड क्षेञिय कार्यालय अतिक्रमण कार्यवाही

   
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ड क्षेञिय कार्यालय अतिक्रमण विभागामार्फत शनिवार दिनांक 25-07-2015 रोजी अतिक्रमण कारवाई
करण्यात आली. महापालिकेच्या सार्वजनिक सुटि्टच्या दिवशी अतिक्रमण कारवाई होत नसल्याने काळेवाडी , पिंपरी कॅम्प ,सुदर्शन चौक, सृष्टी चौक, पिंपळे गुरव ,सांगवी फाटा याठिकाणी शहराच्या वेगवेगळ्या भागातून
तसेच बोपोडी, औंध या भागातूनही हातगाडी व टेंम्पोमध्ये विविध वस्तू, फळे, भाजीपाला विक्री करणारांकडून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात येते.
 
 
याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने ड क्षेञिय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागामार्फत 25 जूलै रोजी दुपारी 12.00 ते राञी 8.00 या वेळेत अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली क्षेञिय कार्यालयाच्या विविध भागामध्ये करण्यात आलेल्या सदर कारवाई मध्ये 22 हातगाड्या, 2 टेंम्पो व्यापा-यांनी दुकानाबाहेर अतिक्रमण करुन लावलेले साहित्य जप्त करण्यात आलेले आहे.
 
 

मध्यप्रदेश शासनाच्या अधिकाऱ्यांची भेट

   
पिंपरी, दि. १५ जुलै २०१५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांची व कामकाजाची माहिती जाणून घेण्यासाठी मध्यप्रदेश शासनाने पाठविलेल्या ३४ अभियंत्यांना सहाय्यक आयुक्त डॉ. महेश डोईफोडे व प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांनी माहिती दिली.
मध्यप्रदेश मधील विविध नगरपालिका व महानगरपालिकांमध्ये नगरविकास खात्याने नियुक्त केलेल्या ३४ अभियंत्यांचे पथक आज महापालिकेत आले त्यावेळी सहाय्यक आयुक्त महेश डोईफोडे यांनी त्यांचे स्वागत केले.


 
 
यावेळी महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती व विकास प्रकल्पांची यशोगाथा चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली. त्यानंतर स्काडा प्रणाली, सेक्टर २३ येथील पाणीपुरवठा प्रकल्प, मैलाशुध्दीकरण प्रकल्प व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना या अभियंत्यांनी भेट देवून माहिती जाणून घेतली.
 
 

स्मार्ट सिटी योजनेमध्ये नागरिकांचा सहभाग

   
केंद्र शासनामार्फत घोषित करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये नागरिकांचा सहभाग असावा याकरिता अ क्षेत्रीय कार्यालयामध्ये महानगरपालिकेचे मार्फत आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत,सन्मा.नगरसद स्य् श्री. जावेद शेख, श्री. बाळासाहेब तरस, श्री. मोरेश्व्रर भोंडवे, श्री. प्रसाद शेट्टी, शारदा बाबर, सविता साळुंके, नंदा ताकवणे, संगिता भोंडवे, मा.आयुक्त् राजीव जाधव, सहशहर अभियंता श्री. राजन पाटील, अ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी श्री. प्रशांत खांडकेकर, माजी सह आयुक्त् श्री. अमृतरा साववंत, याच बरोबर लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. ओमप्रकाश पेठे, आर्कीटैक्ट श्रीमती. उषा रंगराजन, श्री. धर्मपाल तंतरपाळे,

 
 
ज्येष्ठ् नागरीक संघाचे पदाधिकारी श्री.सुर्यकांत मुथियान, श्री.सी.व्ही. जोशी त्याच बरोबर अनधिकृत जाहिरात समिती मधील सदस्य श्री. सुभाष निकम, सिटीझन फोरमचे श्री. आनंद पानसे, विवेक मित्र मंडळाचे श्री. निलेश शिंदे इत्यादींनी सहभाग घेतला. यावेळी महापालिकेच्या ई गव्हर्नन्स विभागाचे श्री. निळकंठ पोमण यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन स्मार्ट सिटी योजनेबाबतची संकल्पना स्पष्ट केली. व जेएनएनयुआरएम कक्षामार्फत योजनांचे सादरीकरण केले. यावेळी उपस्थितांनी स्मार्ट सिटीबाबतची आपली मते, सूचना नोंदविल्या. यामध्ये विशेषत: पिंपरी चिंचवड शहराला बेस्ट सिटी पुरस्कार प्राप्त् झाल्याने केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये या शहराचा समावेश व्हावा अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त् केली.त्याच बरोबर या शहराचे आरोग्य , पर्यावरण, शैक्षणिक, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था , वाहनतळ इत्यादीचे नियोजनामध्ये सुसूत्रता व्हावी याकरिता महापालिकेने जास्तीत-जास्त चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी केली तर नागरिक देखिल सहकार्य करुन हे शहर जास्तीत-जास्त स्वच्छ ,सुंदर करण्यामध्ये स्वयंप्रेरणेने सहभागी होतील असे मत देखिल नोंदविण्यात आले.
 
 

एम.आय.टी विद्यालयाची भेट

   
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहीती जाणून घेण्यासाठी आलेल्या पुणे येथील एम.आय.टी विद्यालयातील प्राध्यापक मनिष केळकर यांच्या नेतृत्त्वा खालील वीस सदस्यीय शिष्ट मंडळाचे स्वागत ई-गव्हर्नन्स अधिकारी निळकंठ पोमण यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेच्या महापौर कक्षात झालेल्या कार्यक्रमात ड प्रभाग अध्यक्ष अरुण टाक, नगरसदस्या शमीम पठाण, मंदाकीनी ठाकरे यांच्यासह रमेश भोसले, प्रकाश बने आदी उपस्थित होते. यावेळी महापलिका निवडणुक, नेतृत्व विकास, अनाधिकृत बांधकाम, महापालिका दैनंदिन कामकाज तसेच महापौर, उपमहापौर, सत्तारुढ पक्षनेता, विविध समित्यांचे सभापती, आयुक्त,
 
 
अतिरीक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचारी यांच्या कार्यपध्दती बाबतची माहीती ड प्रभाग अध्यक्ष अरुण टाक, नगरसदस्या शमीम पठाण, मंदाकीनी ठाकरे यांनी शिष्टमंडळास दिली. शिष्टमंडळाने महापालिकेतील विविध विभागांसह सर्वसाधारण सभागृह व स्थायी समिती सभागृहास भेट देऊन तेथिल कार्यपध्दतीची माहीती जाणून घेतली.
दरम्यान महापलिकेच्या आकुर्डी येथिल उर्दु व मराठी शाळेस तसेच मोशी येथिल घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासह विविध प्रकल्पांना भेट देऊन शिष्टमंडळाने माहीती जाणून घेतली.
 
 

क्रीडा साहित्याचे वाटप

   

मनपा शाळेतील विद्याथार्त्यांना मा.क्रीडा सभापती श्री. जितेंद्र ननावरे यांच्या वतीने क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
 
 

 
Social Message by pcmc
 

कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करा, शहर स्वच्छ ठेवणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in